मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारने मे महिन्यात आयोजित केलेल्या वेव्हज उपक्रमाचा कार्य अहवालही यावेळी प्रकाशित करण्यात आला.
देशाच्या भविष्यासाठी विशेषतः तरुणांना मनोरंजन क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले. देशातल्या आयआयटी आणि आयआयएम शैक्षणिक संस्थांच्या धर्तीवर सर्जनशील तंत्रज्ञानासाठीही शैक्षणिक संस्थांची निर्मिती व्हावी, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी केल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने मे महिन्यात घेतलेल्या वेव्हज् या उपक्रमामुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. आयआयसीटीसारखी संस्था मुंबईत सुरु केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. यावेळी IICT च्या बोधचिन्हाचं अनावरण झालं, आणि या संस्थेत आता अध्यापनाला सुरुवात झाल्याचं घोषित करण्यात आलं. प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात यावेळी एक सामंजस्य करार झाला. IICT चे पहिले अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहेत. या संस्थेत १८ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातील, ज्यात गेमिंग, पोस्ट प्रॉडक्शन, ॲनिमेशन, कॉमिक्स, एक्स्टेंडेड रियालिटी अशा क्षेत्रांशी संबंधित विषयांचा समावेश असेल.