केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. नॅशनल कँसर इन्सिट्यूट ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश स्वस्ती आणि तेलंगणा या सर्व ठिकाणचे रुग्ण इथे उपचार घेऊ शकतील याबद्दल शाह यांनी समाधान व्यक्त केलं. गेल्या दहा वर्षात देशातलं वैद्यकीय क्षेत्राचं चित्र बदललं असल्याचं सांगून वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागाही वाढवण्यात आल्याची माहिती शाह यांनी दिली, केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून गरिबांना ५ लाख ते ६० कोटींपर्यंतचे उपचार निःशुल्क उपलब्ध करुन देत असल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
नॅशनल कँसर इन्सिट्यूटमध्ये जगभरातील अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून या ठिकाणी एक प्रिमियर रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात संशोधन संस्था म्हणून विकसित करणार येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालं. आज ते नांदेडला रवाना होतील. नांदेड इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर ते शंखनाद या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
नंतर अमित शहा मुंबईत येणार असून उद्या दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापनदिन महोत्सवाला उपस्थित राहतील.