मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच कुसुमाग्रजांना अभिवादन केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही कुसुमाग्रजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. तसंच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकच्या शिरवाडे वणी इथं ‘कवितेचं गाव’ साकार होत असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. याठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलनं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पोस्ट कार्ड जारी केलं. सुलेखनकार अच्युत पालव आणि लेखक गणेश मतकरी यावेळी उपस्थित होते.