महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलपर्यंत या समितीच्या शिफारशी येतील, त्यानुसार पुढच्या तीन महिन्यात कर्जमाफी मिळेल, असंही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात असून त्यापैकी ८ हजार कोटी रुपये आत्तापर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या आठवड्याच्या अखेरपर्यंत १८ हजार ५०० कोटी रुपये दिले जातील, तर १५ दिवसांत ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी तरतूद केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच, इतर यासंदर्भातल्या इतर विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
 
									 
		 
									 
									 
									 
									