भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

 

मुंबईत महावीर जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे ‘महावीर स्वामी जन्म कल्याणक’ या महोत्सव आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होेते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला ‘जैन जगत’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला.  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे देखील महत्वाचे असते असे यावेळी सांगितले. यावेळी आचार्य नयपद्मसागर यांनी मुंबईतील १५०० सार्वजनिक शाळांना नवसंजीवनी देऊन तेथील लाखो गरीब मुलांना मोफत भोजन, शिक्षण, कौशल्य शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प सोडला.  

 

पुण्यात आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीनं मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. 

 

नाशिकमध्ये महावीर जयंती निमित्तं नाशिकरोड, सिडको या परिसरात मिरवणुका काढण्यात आल्या. 

 

छत्रपती संभाजीनगर इथं जैन समाजाच्या वतीने पैठण गेट परिसरातून गुलमंडीमार्गे मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या अनेक जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

अकोला शहरात जैन समाजाच्या वतीनं प्राचीन जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली.

 

नागपूर इथं श्री दिगंबर जैन परिवार मंदिर ट्रस्ट आणि सकल जैन समाजाच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
धुळे शहरात भगवान महावीर जयंती निमित्त आज सकाळी सकल जैन समाजाच्या वतीनं वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

नांदेडमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्राही काढण्यात आली. सांगली शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर आणि निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं.

 

भगवान महावीर यांचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या कुंडलपूरमध्ये शोभायात्रा, मस्तकाभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नालंदा इथंही पावापुरी मधल्या जैन मंदीरात जैन भाविक मोठ्या संख्येनं पूजाअर्चा करत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.