मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले, भापकचे सुभाष लांडे सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला असून सत्तेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. मताचा आणि लोकशाहीचा अधिकार जतन करणं हे आपलं कर्तव्य असून राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एक व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.
मतदार याद्यातले त्रुटीचे पुरावे न्यायालयात देणार असून न्यायालयाला दाद मागणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सर्व नागरिकांनी मतदार यादीत आपापली नावं तपासून घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. तर मतदार याद्यातले दोष दूर केल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात याचा पुनरूच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सभेला संबोधित केलं. आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते.
विरोधी पक्षांनी निवडूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला भाजपानेही मोर्चा काढून प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्ष दुटप्पी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.