डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

 
मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. 
 
 
ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तसंच वाहतुकीलाही फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांची सुटका करण्यात आली. 
 
 
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सतत पाऊस पडत असून गेल्या तीन दिवसांत त्याचा जोर वाढला आहे. इथल्या ८० गावांमधल्या ४१ हजार ४७२ हेक्टरवरच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. परभणीत संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
 
 
कोल्हापूर जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे काही रस्ते बंद झाले असून नद्या, ओले आणि नाल्यांचं पाणी पात्राबाहेर आलं. सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर मुख्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण जवळपास पूर्ण भरलं आहे. सांगली जिल्ह्यात संततधार सुरू असून वारणा आणि कृष्णा नद्या दुथडी भरून वाहात आहेत.
 
 
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पुरामुळे पळशी आणि संगम चिंचोली या गावांचा संपर्क तुटला. इथल्या नागरिकांना बाहेर काढायचं काम सुरू आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातलं नागापूर धरणाचा जलायश ओसंडून वाहू लागल्यानं अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला. यामुळं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 
 
 
रायगड आणि पुणे घाट परिसराला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला, तर रत्नागिरी, कोल्हापूर घाट, सातारा घाट, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि नंदुरबार या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.