डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईतल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई उपनगरातल्या शासकीय जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली. आमदार योगेश सागर यांनी या भागातल्या अतिक्रमणाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.   मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, तसंच मुंबईच्या जिल्हाधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. 

 

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र आत्तापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार नारायण कुचे यांनी मांडलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते.

 

नाशिक महापालिकेअंतर्गत ठेकेदारीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदा पद्धतीने पैसे काढून घेत असल्याच्या तक्रारींची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. असे प्रकार होऊ नयेत, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला यादृष्टीने योजना तयार करण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचं आणि दोन महिन्यांत ही योजना तयार करण्याचे निर्देश त्यांना देण्याचंही त्यांनी जाहीर केलं.

 

विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होण्यापूर्वी न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधानसभेनं संमत केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. सभागृहानं एकमतानं तो मंजूर केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा