राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातून जवळपास तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. पुरामुळे नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. नांदेड महापालिकेने शहरातल्या शेकडो नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं आहे.
बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यांमधे जवळपास साठ गावांचा संपर्क तुटला आहे. गेवराई धरणातून सध्या अडीच ते तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुराचा धोका वाढल्याने नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं आहे.
धाराशिव जिल्ह्यात सिना कोळेगाव धरणातून सध्या ९५ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून सिना नदीकाठावरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे. काल रात्रीनंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमधून विसर्ग देखील कमी झाला आहे. वडाळा गावात एका घराची भिंत कोसळून एका वृध्दाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं काल रात्री नाशिकमध्ये आगमन झालं. काल रात्री उशिरा त्यांनी नासर्डी नदीची पहाणी केली,नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याची हमी त्यांनी दिली त्यानंतर आज सकाळी रामकुंड परीसरात नदी काठी त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने आज दुपारी १२ वाजेपासून विसर्ग कमी करून ६ हजार क्युसेक करण्यात आला आहे. तर
नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८८ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. तो आता सुमारे ६५ हजार क्युसेक असा करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नाशिकमध्ये येणार असून दुपारी जिल्हा प्रशासनाची पूरस्थितीबाबत बैठक घेणार आहेत.