महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. दुपारी ते लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत.
सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असं भरणे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन आपद्ग्रस्तांना देत नुकसानभरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना जिल्ह्यात सुमारे ६ लाख ३५ हजार एकराचं नुकसान झालं असून पंचनाम्याचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जालन्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घनसावंगी तालुक्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असं मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं.