महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकन अर्जांची छाननी

महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या अर्जांच्या छाननीला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. २ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.  

 

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ११ हजार ३९२ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले असून त्यापैकी २ हजार ५१६  अर्ज दाखल झाल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं. 

 

काल अखेरच्या दिवसापर्यंतही अनेक ठिकाणी जागावाटपाचं चित्र स्पष्ट नव्हतं. सर्व राजकीय पक्ष स्थानिक समीकरणं पाहून युती आणि आघाडीचा निर्णय घेत आहेत. अनेक ठिकाणी विरोधी आघाड्यातल्या घटक पक्षांनी एकमेकांशी युती केली तर काही ठिकाणी सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचं जाहीर केलं. अनेक उमेदवारांनी काल पक्षांतर करून उमेदवारी मिळवली. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. 

 

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेना युतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं  आहे, यानुसार भाजपा १३७ जागा लढणार असून शिवसेना ९० जागा लढवणार आहे. तर रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र ३९ जागांची घोषणा केली आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप एकत्र निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनीही काल दिवसभर एबी फॉर्मचं वाटप केलं. मात्र त्यांचं जागावाटप स्पष्ट झालं नाही. दरम्यान, राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.