पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू – उद्धव ठाकरे

आपलं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचं नुकसान न करता तेल, डाळ, साखर, तांदूळ, गहू या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षं स्थिर ठेवून दाखवू, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रत्नागिरी इथं काल संध्याकाळी त्यांची सभा झाली. आपलं सरकार आलं, तर बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करू असं आश्वासनही त्यांनी या सभेत बोलताना दिलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण, महिलांसाठी महिला अधिकारी असलेली स्वतंत्र पोलीस ठाणी, १० रुपयांमध्ये गोरगरिबांना पोटभर जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार अशा आश्वासनांबरोबरच महाराष्ट्रात नवे उद्योग आणून दाखवू आणि मुंबईत जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र उभारू असं ठाकरे या सभेत बोलताना म्हणाले.