राज्यातल्या तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मध्ये २४६ होती. ती २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत कमी झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत चर्चेच्या उत्तरात दिली. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
त्यासाठी महिला आणि बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास या संबंधित विभागांचा गट तयार करण्यात येईल, असंही तटकरे म्हणाल्या. उमा खापरे यांनी कुपोषणामुळे बालकांच्या होणाऱ्या मृत्यूसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय खोपडे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने पोहोचावा, याबाबत राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार असल्याचं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल चर्चा उपस्थित केली होती. यावेळी सदस्य अमोल मिटकरी, ज.मो.अभ्यंकर हे चर्चेत सहभागी झाले होते. अमोल मिटकरी यांनी अस्सल चरित्र साधन समिती अद्याप गठित न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.