दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर पुन्हा भारतभेटीवर आला आहे. गोट इंडिया टूर या खासगी दौऱ्याच्या निमित्तानं तो आज पहाटे कोलकात्यात दाखल झाला. कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं. पण तो तिथे काही मिनिटंच थांबून निघून गेला. हजारो रुपयांची तिकिटं काढून आलेल्या चाहत्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावल्या. यामुळे तिथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
या गोंधळाप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी या कार्यक्रमाचा आयोजक सताद्रु दत्ता याला अटक केली. राज्यपाल डॉ. सी. व्ही. अनंत बोस यांनी या घटनेला जबाबदार आयोजक आणि प्रायोजकांना तत्काळ अटक करण्याची सूचना राज्य सरकारला दिली होती. मैदानावरील परिस्थिती नियंत्रणात असून प्रेक्षकांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद शमीम यांनी दिली.
तत्पूर्वी, या घटनेच्या चौकशीसाठी प. बंगाल सरकारनं निवृत्त न्यायाधीश अशिम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल समाजमाध्यमांवर दिलगीरी व्यक्त केली आहे. तर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सी हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली इथंही जाणार आहे.