खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८४ पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३३ सुवर्ण आणि २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४४ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २७ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
खेलो इंडियाचा आज नववा दिवस असून आज दिवसभरात मुष्टियुद्ध, टेनिस आदी खेळांचे सामने झाले. तसंच नव्याने समाविष्ट झालेले कलारीपायत्तू आणि थांग खेळही खेळले गेले.
फूटबॉलमधे ओदिशाच्या पुरुष संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी मिझोरामचा ५-१ असा पराभव केला. फूटबॉलमधे महिला संघाचा अंतिम सामना उद्या तामिळनाडू आणि झारखंड यांच्यात होणार आहे. कलारीपायत्तू मधे छत्तीसगडच्या अर्जुुन कुमार चंद्रा आणि अनंत स्वरंकर यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर जम्मू काश्मीरच्या नितीन कुमारनं कांस्य पदक पटकांवलं. भारोत्तलन स्पर्धेत महाराष्ट्राच्या साईराज परदेशीनं क्लीन अँड जर्क प्रकारात १७१ किलो वजन उचलून तसंच सर्वसाधारण प्रकारात ३११ किलो वजन उचलून विक्रम प्रस्थापित केला.