सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होणार आहे. बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा होईल. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, इतर प्रशासकीय अधिकारी, क्रीडाक्षेत्रातले इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत ५६ सुवर्ण आणि ४५ रौप्य पदकांसह १४९ पदकं मिळवून अग्रस्थानी आहे. हरियाणाने काल जोरदार कामगिरी करत ३५ सुवर्ण आणि २६ रौप्य पदकांसह एकूण १०७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावले. राजस्थान २२ सुवर्ण पदकांसह ५५ पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानं काल अॅथलेटिक्स स्पर्धेत दहा सुवर्ण पदकांसह १५ पदकं मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली.