पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव आज जम्मू – काश्मीर विधानसभेने विशेष अधिवेशनात मंजूर केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विनंतीवरुन नायब राज्यपालांनी हे अधिवेशन बोलावलं होतं. हा अतिशय क्रूर, निर्घृण, अमानुष आणि भ्याड हल्ला काश्मीरियतवर, तसंच संविधानाच्या एकता, शांती आणि सलोख्याच्या तत्वांवर झाला असल्याचं या ठरावात नमूद केलं आहे.
हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रति वचनबद्धता व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. पर्यटकांचा जीव वाचवताना मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसैनच्या शौर्याला सभागृहाने अभिवादन केलं. काश्मीरमधे प्रथमच दहशतवादाला उघड आणि उत्स्फूर्तपणे विरोध होत असल्याचं प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलं.
हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केंद्रसरकारने राजनैतिक स्तरावर घेतलेल्या निर्णयांना सभागृहाने पाठिंबा जाहीर केला. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन, भाजपाचे सुनील शर्मा, काँग्रेसचे गुलाम अहमद मीर, सीपीआय एम चे एम वाय तारिगामी आणि वाहीद उर-रहमान यांनीही चर्चेत भाग घेतला.