महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमारास पाच मजुरांचा मृत्यू झाला. पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते आणि पत्र्याची शेड करून राहत होते. अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकानं घाईनं टिप्पर रिकामा करताना झोपलेल्या मजुरांना पाहिलं नाही, आणि त्यांच्यावर वाळू ओतली. त्यामुळे ही घटना घडली. वाळूच्या ढिगाऱ्याखालून गावकऱ्यांनी एका लहान मुलीला सुखरूप बाहेर काढलं असल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहायानं वाळू बाजूला घेतली. त्यानंतर मृतदेह पुढच्या तपासणीसाठी पाठवले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.
Site Admin | February 22, 2025 8:28 PM | jaalna
जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्या खाली दबल्यानं ५ मजूरांचा मृत्यू
