इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारीसुद्धा इंडिगोची ४०० हुन अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापैकी बंगळुरू विमानतळावर १२४, मुंबई विमानतळावर १०९ तर पुणे विमानतळावरच्या ४२ विमानसेवा आज रद्द झाल्या आहेत.
मात्र, विमानउड्डाणांच्या वेळांमधली दिरंगाई तसंच विमानं रद्द होणं आटोक्यात आलं असून विमानतळांवर आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना प्रवासात प्राधान्य देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विमानतळांवर कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय तसंच विमानसेवा नियंत्रकांनी न्यायालयाच्या आदेशाचं कसोशीनं पालन करावं आणि वैमानिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहन वैमानिक संघटनेनं केलं आहे.
Site Admin | December 6, 2025 1:35 PM | IndiGo | Indigo Flights Cancelled
इंडिगोची ४०० हून अधिक उड्डाणं रद्द