इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत १० टक्के कपात करायचे आदेश दिल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना आज पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं. ६ डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची, तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची प्रक्रिया वेगानं पूर्ण करायच्या सक्त सूचना दिल्याची माहिती एल्बर्स यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव मधुसूदन शंकर यांनी आज मुंबई विमानतळ टर्मिनल २ इथं भेट देऊन इंडिगोच्या विमानसेवेतल्या अनियमिततेने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.