इंडिगो कंपनीची विमानउड्डाणं रद्द झाल्यानं ३ तारखेपासून नागरी हवाईसेवेत झालेल्या खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडीगो विमान कंपनीला त्यांच्या वेळापत्रकात विमान उड्डाणांमध्ये पाच टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः अधिक मागणी आणि अधिक वारंवारता असलेल्या उड्डाणांसाठी हे निर्बंध लागू होतील असं संचालनालयानं म्हटलं आहे. हवाई वाहतुकीसंबधित विभागानं कंपनीला उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक दाखल करायला सांगितलं आहे.
देशातल्या विमानउड्डाणांची सद्यस्थिती आणि प्रवाशांशी संबधित सेवांबाबतचा आढावा घेण्यासाठी विमानतळांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. अधिकाऱ्यांना या भेटीत आढळलेल्या त्रुटी तसंच प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊन ताबडतोब कारवाई करायला सांगितल्याचं मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.