भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्ध नौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन फ्रंटलाइन सर्फेस कॉम्बॅटन्स एकाच वेळी जलावतरण करण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.
संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांमध्ये रचना, शस्त्रे आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून सागरी मोहिमांना सामोरं जाण्यासाठी सक्षम आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई इथं तयार झालेली उदयगिरी युद्धनौका आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स कोलकाता इथं तयार झालेली हिमगिरी युद्धनौका हे देशाच्या वाढत्या जहाजबांधणी कौशल्याचं उदाहरण आहे.