पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जोरकसपणे उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एकप्रकारे दहशतवाद्यांना पैसा आणि प्रशिक्षण पुरवल्याची कबुली दिली असल्याचं भारताच्या उप स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी काल सांगितलं.
ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाश्चात्य देशांसाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याची कबुली दिली होती, हे साऱ्या जगाने ऐकलंच आहे, असं त्या म्हणाल्या. पाकिस्तान उलट भारतावरच बेछूट आरोप करत असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
पहलगाम हल्ल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी भारताला मजबूत पाठिंबा एकमुखाने दिल्याचं सांगून पटेल यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.