ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करणार

देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल, असं केंद्रीय कृषी आणि ग्राम  विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस अर्थव्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. हे पथक, शेतकरी, वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लाभधारकांच्या सूचनांना अनुसरून, ऊस उत्पादन धोरण आणि संशोधन विषयक दिशानिर्देश तयार करेल, असं ते यावेळी म्हणाले. हे संशोधन शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यावर आणि त्यांच्यासाठी व्यवहार्य उपाय शोधण्यावर केंद्रित असेल, असं त्यांनी सांगितलं.