डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात ४ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे. मराठवाड्यात हिंगोली, जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आढावा घेतला असून, शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन प्रशासनानं त्वरित मदत करावी, असेही निर्देश दिले आहेत. 

 

नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचं पथक तैनात केलं आहे. जायकवाडी धरण हे ८८ टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे विष्णुपुरी धरणाचे ११ दरवाजे उघडले आहेत. 

 

जालना जिल्ह्यात घडसावंगी तालुक्यात एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. अंबड तालुक्यात शिराढोण वाडी इथं पावसामुळे घराची भिंत कोसळून ३ जण गंभीररीत्या जखमी झाले, तर एकाला  किरकोळ दुखापत झाली. 

 

परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्यानं जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. परभणी – जिंतूर महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. सेलू इथं पूरस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे. ६० सैनिक आणि वैद्यकीय पथकं बचावकार्य करत आहेत. गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे.

 

हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला महापूर आला आहे. यामध्ये १० ते १५ गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं शेतात राहणारे मजूर अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावातल्या शिवारात १५ ते २० मजूर पुराच्या पाण्यात अडकले आहेत. वसमत ते उमरा फाटा मार्गावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग तुटल्यानं या मार्गावरची वाहतूक बाधित झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं बचावकार्य करत आहेत. 

 

लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी ६ तालुक्यांमधे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

 

बीड जिल्ह्यात आज सकाळी ९२ मिलीमिटर  इतका पाऊस झाला. एकूण ६२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यापैकी ३५ महसुली मंडळामध्ये १०० मिलीमिटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 

 

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस सातत्यानं पाऊस पडत असून शेतात पाणी शिरलं आहे. 

हवामान विभागानं येत्या २४ तासांसाठी धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, आणि नांदेड या जिल्ह्यांमधे रेड अलर्ट दिला आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.