राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या साकत गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या गावात अडकलेल्या १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यादलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.
बीड जिल्ह्यतल्या माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे सध्या माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडला आहे. तसंच शेतातल्या उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे.
पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत.