डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 26, 2024 9:06 PM | Heavy rain

printer

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आजही विविध जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे.  नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात मुसळधार पाऊस झाला असून सुसरी धरणातून गोमाई नदीत विसर्ग सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यातल्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून तीन जण वाहून गेले आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातल्या दोन, तर अक्राणी तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या ४२ घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या केळी, पपई आणि कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. 

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, पेठ, त्र्यंबक या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसंच अनेक तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या दहा धरणांमधून विसर्ग सुरू आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचं प्रमाण प्रचंड असल्यानं शेतीचं नुकसान झालं आहे. पावसाने रस्तेही पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. आष्टी तालुक्यात सततच्या पावसामुळे उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, कांदा आदी पिकं सडून गेली आहे. 

धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे पांझरा नदीची पाणीपातळी आणखी वाढल्याने नदीवरचे तीन पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धुळे शहरातल्या मोती नाला, सुशी नाला यांची पाणी पातळी वाढून घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या नाल्यांकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यानं सर्वच धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वाई इथल्या धोम आणि बलकवडी धरणातून कृष्णा नदीत विसर्ग सुरु आहे. मोरणा गुरेघर धरणातून आज दुपारी चार वाजता मोरणा नदीत पाणी सोडलं जाईल. तसंच, कण्हेर धरणातून वेण्णा नदीत पाणी सोडलं जाईल. 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात शनिवारी पहाटे कोसळलेली दरड हटवण्याचं काम आज पूर्ण झालं. दुपारनंतर या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. लवकरच दुहेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.