डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. 

 

रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून, सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तसंच  दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या २४ तासांत  १४३ पूर्णांक ११ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली. जगबुडी, शास्त्री आणि कोदवली या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली आहे. मुसळधार पावसामुळे देवरूख संगमेश्वरमध्ये ठिकठिकाणी पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

 

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून सहा वक्री दरवाजे आज सकाळी ११ वाजता  १ फूट ६ इंच उघडून ३ हजार ४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला  धरण पायथा विद्युतगृहातुन २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 

 

नाशिक जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या २४ लहान मोठ्या धरणांमधील साठा सरासरी ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

 

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी याबाबत माहिती दिली.