डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीतल्या आमकरवाडीत काल रात्री पडलेल्या अतिपावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाली आला. चार-पाच फूट उंचीची पोफळीची ७० रोपं मातीखाली गाडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राजापूरमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आल्यानं शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पाणी आलं आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातल्या वाकेड घाटामध्ये काल मध्यरात्री दरड कोसळली. त्यामुळे एका बाजूनं रस्ता बंद झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र दरड हटवण्याचं काम सकाळी हाती घेण्यात आलं. खेड तालुक्यात कशेडी घाटातही काल संध्याकाळी दरड कोसळली होती. गुहागर तालुक्यात, तसंच रत्नागिरी तालुक्यातही काही ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

 

पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

पुणे जिल्ह्यात मुळशी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पिरंगुट इथल्या पुणे-कोलाड महामार्गावरील तात्पुरता बांधलेला भराव वाहून गेला असून, नवीन पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी आलं आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले. राजाराम आणि शिंगणापूर बंधारे जलमय झाले असून, पंचगंगा नदीची पाणीपातळी १४ फूटांवर पोहोचली आहे.