मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ८० मिमी पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन ५ लाख ७१ हजार ९५० रुपयांचं नुकसान झाल्याही माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. दरम्यान समुद्र खवळला असल्यान अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या पावसामुळे महावितरणचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तो सुरु करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे काल वाहतूक ठप्प झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे काल संध्याकाळी वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले. त्यामुळे अनेक भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यापैकी कसबा गावाचा वीजपुरवठा इतर ठिकाणांहून वीज घेऊन काही कालावधीत सुरू करण्यात आला; मात्र मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे यांसह अन्य काही ठिकाणांचा वीजपुरवठा बंदच आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ८२.३३ मिलिमीटर पाऊस संगमेश्वरमध्ये पडला. या पूर्वमोसमी पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली, तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
लातूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी आडवी झाली आहे. निलंगा तालुक्यात टरबुजाची शेती उद्घवस्त झाली आहे. तर आंब्याच्या फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे.