वस्तू आणि सेवा कर उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक संपन्न

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह ९ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर २ राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते. यात आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा यांनी सविस्तर सादरीकरण केलं. जीएसटी अंमलबजावणी समितीनं (जीआयसी) महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला तसच सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित असल्याचं सांगितलं. जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक असून नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र सादरीकरण करेल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. ही बैठक केंद्र-राज्य यांच्यातला आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं.