तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केल्यानंतर त्या मुंबईत बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो असं सांगतानाच त्यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचं उदाहरण दिलं. लाभार्थ्यांना हवं तिथे पैसा वापरण्याची संधी मिळाल्यामुळे बचत ठेवींमधे ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे असं त्या म्हणाल्या.
अर्थमंत्री फिनटेक कंपन्यांनी उत्पन्न वाढ, अभिनव उत्पादनं, जोखीम व्यवस्थापन या मूलभूत क्षेत्रावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक जगासाठी वित्तीय उपलब्धता ही यंदाच्या फिनटेक महोत्सवाची संकल्पना आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर येत्या गुरुवारी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांशी ते संवादही साधणार आहेत.