डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिस्थापना करुन पूजा – आरती केली. यावेळी राजभवनातले अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले. यंदाची राजभवनातली शाडूची मूर्ती नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन पूजा केली. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो, आणि राज्यात सुख शांती नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
ढोलताशांचा गजर आणि गणपतीबाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत असून घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होत आहे. मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक, तर सव्वा लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जात आहे.
गणेशोत्सवाचा सण सुरक्षितरीत्या साजरा व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेनं चोख व्यवस्था केली आहे. बंदोबस्तासाठी मुंबई शहर आणि उपनगरात १७ हजार ६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

 

तसंच निगराणीसाठी अकरा हजार कॅमेरेही लावण्यात आले आहेत. यंदा प्रथमच गणेशोत्सवात ड्रोन, तसंच एआय मॉनिटरिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे.