हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. या मोहिमेचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलं. येत्या २०२७पर्यंत हत्तीरोगाच्या निर्मूलनाचं लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. आजपासून १११ जिल्ह्यांमध्ये १७ कोटी ५० लाखांहून अधिक लोकसंख्येला मोफत औषधं उपलब्ध करून दिली जातील, अशी माहितीही नड्डा यांनी दिली. महाराष्ट्रातही पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतल्या मिळून ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना  प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे.