दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं म्हणजेच एफएटीएफनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या आर्थिक मदतीशिवाय असे हल्ले शक्य होत नाहीत असं या कृती गटानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कुठलाही एक देश किंवा संस्था एकट्याने दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करू शकत नाही, तर दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं एफएटीएफच्या अध्यक्ष एलिसा डी एंडा मदराजो यांनी म्हटलं आहे.
आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं एखाद्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याची ही घटना काहीशी दुर्मिळ असून गेल्या दशकभरात या गटानं केवळ तीन वेळा असा निषेध नोंदवला आहे, एखादा देशच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं एफएटीएफनं अधिकृतरित्या नोंदवणं हे देखील प्रथमच घडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.