भारताविरुद्ध युद्धखोर, द्वेषपूर्ण आणि निष्काळजी वक्तव्यं करणं ही पाकिस्तानच्या नेत्यांची सवय असून पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. अशी आगळीक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे भारतानं अलिकडेच दाखवून दिलं आहे, असंही ते म्हणाले.
सिंधू जल कराराविषयी लवादाने दिलेला निर्णय भारत नाकारतो, भारतानं या लवादाला कधीच वैध मानलं नाही असं जयस्वाल म्हणाले.
भारत-अमेरिका यांच्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, या दोन्ही देशांमधे व्यापक धोरणात्मक भागीदारी असून यात अनेकदा चढउतार येत असतात. मात्र परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधावर आधारित हे संबंध पुढे चालू राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.