देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जाक्षेत्र आधुनिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं, असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं. पश्चिम प्रभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. अशा स्थानिक परिषदांमुळे त्या त्या ठिकाणच्या समस्या सोडवायला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०४७पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय आणि सहकार्य असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी, राज्यभरात चांगल्या पद्धतीनं ऊर्जापुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती दिली. डिसकॉमच्या कर्जाची पुनर्रचना करण्यासह इतर समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला मदत करावी, अशी विनंतीही फडनवीस यांनी केंद्र सरकारला केली. ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे ऊर्जामंत्री रामकृष्ण ढवळीकर, गुजरातचे ऊर्जामंत्री कनूभाई देसाई यांच्यासह इतर राज्यांचे मंत्री, तसंच संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.
Site Admin | May 13, 2025 7:23 PM | Energy Minister Manohar Lal
देशातलं ऊर्जाक्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं-ऊर्जामंत्री
