राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती, आघाडी करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे.
राज्यातल्या २९ महानगरपालिकानिवडणुकांमध्ये भाजपा-महायुती विजयी होईल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा दावा भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.
जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवडसह इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीतल्या चर्चा वेग घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने चर्चा केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असून येत्या आठवड्यात याबद्दलची घोषणा केली जाईल, असं खासदार संजय राऊत यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं.
काँग्रेसनेही आपल्यासोबत निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना केल्याचं राऊत यांनी सांगितलं.
महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या रणनितीसाठी काँग्रेसची दोन दिवसीय बैठक झाली. या निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी राज्याच्या संसदीय मंडळाची बैठक २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणार असून त्यात या सर्व विषयांवर चर्चा होईल, असं ते म्हणाले.
याच बैठकीत उमेदवारांबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचंही सपकाळ यांनी सांगितलं.
पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकत्रित लढवणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी आज जाहीर केलं.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केलीय. १५१ जागांसाठी तब्बल 1 हजार 489 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज धुळे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या निवडणुकीत ५५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.