मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर ११७ अर्ज अवैध ठरले तर ८३९ अर्ज वैध ठरले.

 

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण १ हजार ४६० अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी २३० अर्ज अवैध ठरले असून १ हजार २३० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. लातूर महापालिकेसाठी एकूण ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर त्यापैकी ६९६ अर्ज वैध ठरले असून, ६३ अर्ज बाद करण्यात आले. जालना महानगरपालिकेसाठी एकूण एक हजार २६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, छाननीनंतर एक हजार २३४ अर्ज वैध ठरले आहेत. 

 

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज पुणे इथे वार्ताहरांशी बोलत होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडून गिळल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काही उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षपात केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेत हा आरोप केला.

 

येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.