डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. स्थलांतरितांच्या प्रवेशाला आळा घालणं, जीवाश्म इंधनाचं उत्पादन वाढवणं आणि २०२१ पॅरिस हवामान करारासह पर्यावरणीय नियम मागे घेणं हे निर्णय ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी घेतले. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. कोविड महामारीची साथ निट न हाताळणं आणि त्यावर तातडीच्या उपाययोजना न करणं या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेकडून जास्त पैसे उकळले, मात्र चीनकडून कमी पैसे घेतले अशी तक्रार त्यांनी केली. या निर्णयानंतर पुढच्या बारा महिन्यात अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडेल आणि त्यांची आर्थिक रसद थांबवेल.

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सोय बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. तसंच ट्रम्प यांनी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित केली असून खाणकामावरील निर्बंध उठवले आहेत. जीवाश्म इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यायचं त्यांनी ठरवलं आहे.

 

नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पुनर्स्थापित करण्यात येईल तसंच केंद्र सरकारचं नियंत्रण कमी केलं जाईल असं ट्रम्प यांनी सांगितलं. मेक्सिकोच्या आखाताचं नाव बदलून ‘अमेरिकेचं आखात’ असं ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे यापुढे अमेरिकेत पुरुष आणि महिला असे दोनच लिंगभाव असतील असा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. ६ जानेवारी २०२१ रोजी राजधानीत झालेल्या दंगलीत सहभागी असलेल्या १५०० जणांना माफ करायचा निर्णयही ट्रम्प यांनी घेतला आहे.