डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्स मध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं.
शहरी भागापासून ते गलवान, सियाचीन आणि लडाखसारख्या दुर्गम लष्करी भागापर्यंत हाय-स्पीड इंटरनेट पोहोचलं आहे. यूपीआयद्वारे दरवर्षी १०० अब्जाहून अधिक व्यवहार होत असून जागतिक पातळीवरच्या रिअल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास निम्मे व्यवहार आता भारतात होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या अभियानानं कोट्यवधी लोकांच्या जीवनात स्थान मिळवलं आणि आणि देशानं सशक्तीकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केला, असं नमूद करत, आरोग्य आणि शिक्षण, अशा क्षेत्रांनाही यामुळे मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.