जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस दावोसला रवाना

स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरु होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दावोस इथं पोहोचले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या पथकात समावेश आहे.
या परिषदेत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करतील आणि आपल्या राज्यात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर देतील असा अंदाज आहे.
 केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी आणि के राममोहन नायडू यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री परिषदेत सहभागी होतील, आणि द्विपक्षीय बैठका घेतील अशी अपेक्षा आहे. या परिषदेत कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि तेलंगणासह विविध राज्य सरकारांचे मंडप उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी दावोस मध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ३ हजारापेक्षा जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. ‘अ स्पिरिट ऑफ डायलॉग’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.