राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल- मुखमंत्री

भारतीय सैन्याने ज्या ताकदीनं आणि अचूकतेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अभूतपूर्व असून राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल, असं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आज वर्षा या निवासस्थानी झाली त्यावेळी  ते बोलत होते.

 

राज्यातल्या सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीत गुप्तचर माहितीचं आदानप्रदान झालं. तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि यापुढे घेण्याच्या खबरदारीबद्दल, तसंच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतिमान समन्वय यंत्रणा उभारण्यावर बैठकीत चर्चा झाली. मुंबईची  सुरक्षा तसंच सायबर सुरक्षेबाबत  घेण्याच्या खबरदारीबद्दल बैठकीत विशेष चर्चा झाली . 

 

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसंच लष्करी अधिकारी उपस्थित होते.