काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी केली आहे. तसं पत्र त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलावण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी या पत्रात केली आहे.
काँग्रेसच्या या मागणीवर भाजपाने टीका केली आहे. ही वेळ चर्चा करण्याची नसून पाकिस्तानला धडा शिकवण्याची असल्याचं ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने या संदर्भात आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन भाजपा प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी केलं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे असं ते म्हणाले.