ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. काल संध्याकाळी वृध्दापकाळानं त्यांचं निधन झालं होतं. ते ९२ वर्षांचे होते. रामायण, महाभारताचे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजी पणशीकर यांनी ५० वर्षांहून अधिक काळ व्याख्यानं आणि साहित्यामधून समाज प्रबोधन केलं.
महाभारत एक सूडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता, कथामृत, कणिकनीती, या ग्रंथांसह विविध दैनिकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखमाला हा महाराष्ट्रासाठी एक वैचारिक ठेवा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाजी पणशीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे चौफेर व्यासंग जोपासणाऱ्या परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला आहे, असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.