अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. सध्या डिजिटल अटक, आर्थिक फसवणूक, सायबर बुलिंग अशा विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती शाळेमध्येही अशा प्रकारची व्यवस्था उभारणं गरजेचं असून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अशा गुन्ह्यांविषयी जागृत करणं गरजेचं आहे. तसंच, एआयच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एआयचीच मदत घ्यावी लागणार आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांच्या प्रश्नावर, विकासावर कधीच बोलू शकत नाहीत. काल झालेल्या दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी हेच सिद्ध केल्याची टीका फडणवीस यांनी केली.