January 22, 2026 10:04 AM | cm davos

printer

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील-मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचे आरेखन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या 56 व्या वार्षिक बैठकीत फडणवीस सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्याला जागतिक स्तरावरच्या व्यावसायिक घडामोडींची माहिती मिळते, त्यामधून महाराष्ट्रासाठी अधिक गुंतवणूक आणि आधुनिक प्रणाली आणण्यास मदत मिळते असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दावोस येथील जागतिक आर्थिक मंच 2026 मध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना स्वच्छ ऊर्जेच्या जलद विस्तारात भारतासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, मुंबई विमानतळाजवळ अत्याधुनिक नवोन्मेष शहर म्हणजेच इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची घोषणाही यावेळी फडणवीस यांनी केली. या प्रकल्पासाठी टाटा समूह 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. स्टार्टअप समुदायाला पाठिंबा देण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेली प्लग अँड प्ले ही परिसंस्था उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.