व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत, या व्हिजन नुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
आपण योग्य मार्गावर आहोत. पुढच्या वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावं, यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे. आपल्या धोरणांची आखणी ह्या व्हिजननुसार झाली पाहिजे. पुढची पाच वर्ष आपण सातत्यानं या व्हिजनवर काम केलं, तर २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू, असं ते म्हणाले. सहकार क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरणही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आलं. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश फडनवीस यांनी दिले. आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.