छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करता यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे युद्धनीतीचा अवलंब केला, त्या युद्धनीतीतून त्यांची सामरिक शक्ती झळकते. ही युद्धनीती वापरूनच पुढच्या मराठेशाहीत देशभरात मराठ्यांचा बोलबाला झाला. याच सामरिक शक्तीच्या अभ्यासासाठीचं अध्यासन केंद्र नवी दिल्लीत उभं राहावं ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबाजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या अध्यासन केंद्राच्या स्थापनेची घोषणा गेल्या वर्षी राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यासाठी सरकारतर्फे १० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका, मराठा साम्राज्याची सैन्य व्यूहरचना आणि किल्ले आणि तटबंदी यामधील पदवी तसंच पीएचडीही करता येणं शक्य होणार आहे.