गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलान यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे १४ हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यामुळे गडचिरोलीचं चित्र पालटलं आहे, गडचिरोलीच्या जल आणि जंगलाचं संगोपन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमानंतर गडचिरोली इथल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ४० लाख वृक्ष लागवड उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडनवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी गडचिरोलीचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार धर्मराव आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री तुलसी मुंडा, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते.